Advertisement

मदन_किल्ला


मदन_किल्ला  

{ नाशिक जिल्हा }

किल्ल्याचे नाव : मदन किल्ला
किल्ल्याची ऊंची : ४९०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : कळसुबाई
चढाईची श्रेणी : अत्यंत कठीण
जवळचे गाव : इगतपुरी, कुरंगवाडी, आंबेवाडी गाव
तालुका : इगतपुरी
जिल्हा : नाशिक, महाराष्ट्र


https://amzn.to/31jY8cm

सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो.

अलंग मदन कुलंग सह्याद्रीच्या कुशीतील अत्यंत अवघड खूप जुनेघाट सह्याद्रिरांगां मध्ये आहेत इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.

नाशिक जिल्ह्याच्या आंबेवाडी गाव आहे. या गावाजवळ गेल्यावर कळसुबाई पर्वताच्या डोंगररांगांमध्ये गगनाला भिडणाऱ्या उंच अशा किल्ल्यांचे त्रिकूट दिसतं. पूर्वेकडे अलंग, मध्यभागी मदन तर पश्चिमेकडे कुलंग दृष्टीस येतो. घनदाट काटेरी झाडांमधून जाणाऱ्या पाउलवाटा पुढे पुढे खडतर होत जातात. त्यामुळे या किल्ल्यांवर ट्रेक करणं म्हणजे धाडसी ट्रेकर्सचंच काम. किल्ल्याच्या आजूबाजूला कळसूबाई शिखर रतनगड हरिश्चंद्रगड खुट्टा व आजोबा पर्वत असे आकाशाला भिडणारे किल्ले व डोंगर मन मोहून टाकतात. या किल्ल्यांमध्ये अलंग व मदन हे कठीण मानले जातात. पण किल्ल्यांमधील सर्वात उंच व मोठा ट्रेक म्हणून कुलांगची ओळख आहे. अलंग सर करताना ७० फुटांचा सरळ उभा असा एक भाग लागतो. त्यासाठी ट्रेकिंग मधील रॉक क्लाइंबिंग किंवा रॅपलिंग अशा कौशल्यांची गरज भासते. 

◆ गडाचा इतिहास :

प्राचीन काळापासून महत्वाचे व्यापारी केंद्र हे जुन्नर, पैठण आणी नाशिक होते. प्राचीन काळापासून या प्रदेशात होणारे व्यापारी दळणवळण पैठण-जुन्नर, पैठण-नाशिक, नाशिक-नगर, नाशिक-पुणे-मुंबई, मुंबई-नगर हे गोदावरी आणी प्रवरेच्या सुपीक प्रदेशातच उदयाला आले आणी त्या साठी व्यापारीमार्गही तयार झाले. पारनेर, भंडारदरा, इगतपुरी कल्याण हा राजमार्ग होता.

येथून कलकत्यापर्यंत माल जात असे. नेवासे ते रतनगड हा महामार्ग त्याकाळात महत्वाचा होता, अकोले, संगमनेर आणी सिन्नर ह्या मार्गावरचे महत्वाचे थांबे होते. याच मार्गावर भव्य शिवमंदिरे आणी बाजारपेठा याची पाऊलखुणा देतात.

सातवाहन काळापासूनच हे राजमार्ग प्रचलित होते. यादवांच्या काळातमात्र या परीसारला पुन्हाएकदा चांगले दिवस आले. रतनगड, अलंग, मदन आणी कुलंग गड यादवांच्या काळातच निर्माण झाले. यादवांच्या साम्राज्यात संपत्तीची मोठ्या प्रमाणावर वाढ असल्याने संरक्षणाची गरज निर्माण झाली आणी त्यासाठी व्यापारीमार्गांचे संरक्षण हया दुर्ग आणी गडांवरून होत असे.

इ.स. १६७० च्या सुमारास कांचनबारीच्या लढाईनंतर मराठ्यांनी केलेल्या धडक मोहीमेत जे किल्ले काबीज केले त्यात अलंग-कुलंग-त्रिंगलवाडीचा उल्लेख सापडतो. या परिसरात दुर्गांचे महत्व शिवकाळात वाढले. राजांनी गडांचे व्यवस्थापन आणी सुरक्षेची जबाबदारी स्थानिक महादेवकोळी आणी आदिवासी जमातीवर टाकली. इंग्रज अम्मल येईपर्यंत या व्यवस्थेत बदल झाला नाही. मराठ्यांची शक्ति ही गडावर असल्यामुळे इंग्रजांनी त्यांचा अम्मल येताच हेतुपूर्वक गडांची नासधूस केली. ह्याचे सगळ्यात जास्त परिणाम अलंग आणी मदनगडांना भोगावे लागले.

◆ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

आंबेवाडी गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फार दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. कुरंगवाडीतून येताना जंगलामधून पायवाटेने प्रथम खालच्या नंतर वरच्या पठारावर पोहोचावे लागते. पठारावर पोहोचण्यासाठी कुरंगवाडीतून तीन तासांची पायपीट करावी लागते. पठारावर आल्यावर मदनगड व त्या शेजारील सुळके आणि कुलंगचा कातळकडा मनात धडकी भरवतो. समोर कुलंगचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो. या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यावर आपण मदनगडला वळसा घालून अलंग व मदन यांच्या मधल्या खिंडीत येतो. खिंडीत पोहोचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवी कडचा मदन किल्ला होय. उजवीकडे वळल्यावर थोड्याच वेळात अरुंद मार्गाने पुढे जात कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. 

सन १८१८ सालच्या इंग्रजांच्या तोफांनी काही ठिकाणच्या पायऱ्या तोडल्या आहेत त्यामुळे ही वाट अधिकच साहसी होते. या कातळकोरीव ८० अंशाच्या कोनातल्या पायऱ्या मनात धडकी भरवतात. या चढणीत पहिला १०-१२ फुटाचा कडा आहे. तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य दरवाजा म्हणजे एक सरळसोट ५० फूट उंचीचा कडा लागतो. येथून प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मधला ५० फुट उंचीचा कातळकडा दोर लावून पार केल्यावर पुढे कड्यातील एका अरुंद पायवाटेने पुढे गेल्यावर परत कातळात खोडलेल्या पायऱ्या आहेत. त्या आपल्याला थेट माथ्यापर्यंत घेऊन जातात.या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा कोसळलेला दुसरा दरवाजा आणि एक छोटी गुहा लागते. खिंडीपासून गडमाथा गाठण्यासाठी २ तास लागतात. गडमाथा तसा लहानसा व बराचसा सपाट आहे. गडावर पाण्याची दोन टाकी आहेत. मात्र यात फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. गडावर २० ते ३० जणांना राहता येईल एवढी गुहा आहे. ह्या गडावर एक नेढं म्हणजे कातळात नैसर्गिकपणे तयार झालेलं भगदाड आहे. पण तिथवर जाताना थोडे सांभाळून जावे लागते. गडावर इतर काही इमारती किंवा बांधकामाचे फारसे अवशेष दिसत नाहीत. या कड्यावरुन कळसूबाई रांगेचे अप्रतिम दृष्य दिसते. हाकेच्या अंतरावर असलेला बेलाग कुलंगगड आपल्याला खिळवून ठेवतो. त्याच्या उजवीकडे प्रचंड विस्ताराचा अलंगगड आपल्याला खुणावतो. दूरवर कळसूबाईचे शिखर दिसते. पाबरगड, रतनगड, कायाबाई, भैरवगड, हरिश्चंद्र, सिद्धगड तसेच स्वच्छ हवामानात माथेरान पेण चंदेरी, मलंगगड तसेच माहुलीची रांगही न्याहाळता येते. बळवंतगड, भिंगलवाडी तसेच कावनाई आड, पट्टा याचेही सुरेख दर्शन होते. मदनगडाचे भौगोलिक स्थान अतिशय मोक्यावर असल्यामुळे चेंढ्या घाट, मेंढ्या घाट तसेच कसारा घाट मार्गावर टेहाळणी करणे सोयीचे जाते तर मदनाच्या पाठीवरती मावळतीच्या तांबुस किरनांना अंगावर झेलत महाकाय कुलंगगड पश्चिमेला विराजमान होता. मदन गड जरी छोटा असला तरी याच्या माथ्यावरून सभोवती दिसणाऱ्या सह्याद्रीचा नजारा हा अद्वितीय आणि अतुलनीयचं..!

◆ गडावर पोहोचण्याच्या वाटा :

१) आंबेवाडी मार्गे :-
अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी किंवा कसारा गाठावे इगतपुरी/कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे.

आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.

अ) एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते. १ तासात आपण खालच्या पठारावर पोहोचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणार्‍या तिसर्‍या घळीपाशी पोहोचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते.येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहोचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.

ब) खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायर्‍या लागतात. या पायर्‍या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

२) घाटघर मार्गे :-
किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी - भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात किल्ल्याच्या तिसर्‍या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहोचतो.

◆ गडावर राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते

◆ गडावरील जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

◆ गडावरील पाण्याची सोय :
बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.

◆ गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ :
आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात.

◆ सूचना :

१) अलंगगडावर पावसाळ्यात जाणे टाळावे.
२) अलंग, मदन, कुलंगगड हा ट्रेक २-३ दिवसात करता येतो.
३) फक्त कुलंगगडावर पायी चालत जाता येते, तर अलंग, मदन गडावर जाण्यासाठी गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

✍ लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव. 


🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

Post a Comment

0 Comments