Advertisement

तब्बल २९_वर्षांच्या कैदेतून महाराणी_येसूबाईंची_सुटका

तब्बल २९_वर्षांच्या कैदेतून महाराणी_येसूबाईंची_सुटका ४_जुलै_१७१९

हिमखंडाचे फक्त टोक दिसतं पण त्याचा तळाकडचा विस्तार दिसत नाही . अगदी तसेच येसूबाईंचे व्यक्तिमत्त्व . येसूबाई म्हणजे मातृहृदयातील असिम पराक्रमाला लाभलेला ममतेचा अमृत झरा आहे .

इ . स . १६८९ मध्ये छत्रपती संभाजी राजे मोगलांच्या कैदेत सापडले तो क्षण तर येसूबाईंवर ब्रह्मांड कोसळण्याचा क्षण होता . संभाजी राजांच्या छळाच्या बातम्या रोज रायगडावर येऊन धडकत होत्या . मरणप्रायः यातनांचा तो काळ क्षणाक्षणाला येसूबाई अनुभवत होत्या . सतत दुःखाचे डोंगर त्यांनी निर्धारपूर्वक बाजूला सारले आणि स्वराज्य संरक्षणाचा विडा उचलला . ' स्वराज्य संरक्षण हेच आपले आता जीवित कार्य ' अशी खूणगाठ बांधून त्यांनी रयतेचे मनोधैर्य वाढवण्यास सुरुवात केली आणि याचवेळी संभाजी राजांची निर्घृण हत्या झाली . त्यावेळीही येसूबाई डगमगल्या नाहीत . त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या . राज्यकर्त्याला स्वतःची सुख , दुःखं नसतात हे जणू त्यांच्या हृदयी भिनले होते . 

संभाजीं महाराजांच्या हत्येनंतर येसूबाईंसमोर बाका प्रश्न उभा राहिला होता तो म्हणचे गादीचा वारसदार कोण ? येसूबाईंसमोर दोन पर्याय होते . एक म्हणजे आपला मुलगा ' शाहू ' यांचे मंचकारोहण करणे किंवा आपला दिर राजाराम यास गादीवर बसवणे . कोणीही अशा परिस्थितीत आपल्या मुलाचा फायदा पाहिला असता . येसूबाईही ते सहजपणे करू शकल्या असत्या पण त्यांनी तसे केले नाही . त्यांनी दिराला गादीवर बसवण्याचा निःस्वार्थ निर्णय घेतला . शाहू प्रौढ होत नाहीत तोपर्यंत राजारामास धनी करावे . हे कार्य करून त्यांनी धीरोदात्तपणे सर्व मराठा मंडळासमोर निःस्वार्थपणाचा एक आदर्श निर्माण केला . स्वतः राजारामाचे मंचकारोहण केले. 

एवढेच नव्हे तर कुणी फितूर होऊ नये म्हणून सर्व मंत्रिमंडळाला एकत्र बोलावून त्यांच्याकडून स्वराज्य रक्षणाच्या शपथा घेतल्या . येसूबाईंच्या निस्सिम भावनेने , स्वार्थ त्यागाच्या कृतीनं सर्व सरदार प्रेमानं एकत्र आहे आणि येसूबाईंच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुध्द लढण्यास सज्ज झाले . एवढेच कर्तृत्व गाजवेल ती येसुबाई कसली . स्वतःच्या जीवाची बाजी लावून राजारामाचे आणि स्वराज्याचे रक्षण त्यांनी केले . रायगडला जेव्हा झुल्फिकार खानांचा वेढा पडला होता त्या कठीण प्रसंगी त्या स्वराज्य रक्षणास प्राधान्य देतात आणि निर्णय घेतात की , ' स्वराज्य राखायचे असेल तर छत्रपती सुरक्षित राहिला पाहिजे ' , म्हणून राजारामाने सरदारांसह व कुटुंबासह बाहेर पडून कर्नाटकात जिंजीकडे जाऊन मराठ्याचा ध्वज अभंग राखावा . तिकडे सुरक्षित पोहोचल्यावर आम्हाला गुप्तपणे तिकडे घेऊन जावे . तोवर आम्हास मुलास घेऊन राहण्यास योग्य जागा रायगडाखेरीज दुसरी नाही असे सांगून स्वराज्य रक्षणासाठी आपले व आपल्या मुलाचे भविष्यही महत्त्वाचे न मानता अत्यंत औदार्याने , उदात्तपणे येसूबाईंनी ही मसलत केली . येसूबाईंच्याच समतोल , दूरगामी विचाराने संपूर्ण राजकुटुंब शत्रूच्या ताब्यात जाण्याचा धोका टळला . पण शाहू गडावर आहेत हे कळताच औरंगजेबाने झुल्फिकार खानाला रायगडावर पाठवले . त्यांनी किल्ल्याला वेढा दिला . बाहेरील सहकार्याशिवाय किल्ला लढवणे शक्य नव्हते . तरीही येसूबाईंनी तब्बल आठ महिने किल्ला लढवला . राजाराम खटपट करून काही मदत करतील , अशी आशा येसूबाईंना होती . पण शेवटी हतबल होऊन येसूबाईंना रायगड मोगलांच्या हातात द्यावा लागला अन् शाहू आणि येसूबाई मुगलांच्या छावणीत कैद झाल्या . पण आठ महिने किल्ला लढवणे आणि सन्माननीय वाटाघाटी करण्याचे जे कार्य येसूबाईंनी केले त्याला तोड नाही . 

पुत्रप्रेमापेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी , स्वराज्य राखण्यासाठी स्वतःला तोफेच्या तोंडी देणारी , पतीस हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी स्वतःचे आभाळाएवढे दुःख बाजूला सारून स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल २९ वर्षे ओलीस ठेवून घेणारी येसूबाई त्यागमूर्ती ठरली.शिवरायांचा आदर्श येसूबाईनी कायम पाळला .शत्रूने बंदी बनवले तरी सुटता वानखेडे येतं हा शिवरायांचा इतिहास आदर्शवत येसूबाईंसमोर होता . या मर्दानीने तेच केले . पण दुर्दैवाने तिला युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही आणि उमेदीची वय २९ वर्षे स्वराज्यासाठी कैदेत काढावी लागली . खऱ्या अर्थाने या असिम त्यागाकडे पाहिल्यावर जाणीव होते आणि अनेक प्रश्न थैमान घालतात . २९ वर्षे येसूबाईंनी कैदेत काढली असणार . आजूबाजूला परधर्मीय माणसं , संपूर्ण वातावरण परकीय , खाणेपिणे , रितीरिवाज सारीच अनाकलनीय . त्या परिस्थितीला कशा सामोऱ्या गेल्या असतील . त्या क्रूरवृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ?

धर्मांतर आणि अब्रूच्या भीतीचे सावट २९ वर्षे कसे पेलले असेल, याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो . एवढ्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल, महाराष्ट्रातील १७ वर्षाच्या कैदेत मुलगा तरी जवळ होता , पण दिल्लीत गेल्यावर १२ वर्षांची जाणीवपूर्वक केलेली ताटातूट कशी सहन केली असेल. अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माजते आणि आपण केवळ तीन - चार महिने कोरोना लॉकडाऊन असतानासुध्दा पिचून जातोय . मानसिक संतुलन ढळायला लागले आहे . विचार करून बघा काय संयम , निर्धार असेल त्या माऊलीचा . त्यांच्या इतके पराकोटी त्याग जीवन जगणे जमेल का आपल्याला ? राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच जीवनाचे सार या मातृदृष्याने बिंबवले . 

कैदेतून त्यांची सुटका झाली या घटनेला ३०१ वर्षे पूर्ण होत आहेत . तरीही असिम त्यागाची , बलिदानाची ही रणरागिणी कुठे तरी उपेक्षित राहिलेली . प्रखर जीवन काय असतं , हे कृतीतून जनमानसावर बिंबवणारी समर्पित त्यागाची ही सखी युवराज्ञी म्हणजे स्वराज्याची बुलंद आधारशिलाच होती . म्हणूनच स्मरताना म्हणावेसे वाटते ,
' कीर्ती रूपे उरली, ही पराक्रमाची शौर्यगाथा 
        आज ही स्मरते स्वराज्य तुझ्या 
त्याग , बलिदान अन् समर्पणाच्या असिम 
                        गाथा '

लेख साभार :- डॉ.स्मिता वानखेडे

Post a Comment

0 Comments