बाजींद भाग ८
"बाजींद"
भाग क्र.८
〰〰〰〰〰〰〰〰
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
•••••••••••••••••••••••••••••
त्या दिवशी दिवसभर "साऊ"ला काही सुचत नव्हते,सतत सकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तरळत होता.
पण,राजे येसाजीरावांच्या एकुलत्या एक मुलीला असे विचार करणे शोभत नाही,म्हणून तिचे मन तिलाच समजावत होते.भावना आणि कर्तव्य यांचा मनात झालेला महापूर प्रथमच साऊ अनुभवत होती.
इकडे,खंडेराय आणि त्याचे वस्ताद काकासाहेब मोठ्या गूढ चर्चेत व्यस्त होते..!
ती चर्चा कोणती त्या दोघांनाच माहिती ..!
एव्हाना तालमीत चीटपाखरू नव्हते..शिर्क्यांची शिबंदी येसाजीरावंच्या आदेशाना त्यांच्यासोबत घाटमाथ्यावर टेहळणी ला गेली होती,जेमतेम शे दोनशे धारकरी वाडा राखत होते.
फौज टेहळणी करून यायला अजून बराच अवकाश होता.
शिर्क्यांचा आजवर कोणी पाडाव करू शकले नाहीत याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे नेकजात,इमानदार मराठ्यांची फौज,त्यात कुस्तीचा प्रचंड नाद असलेले राजे एक एक माणूस तोलून मापून दिमतीस घेत असत ..!
फंद फितुरीला स्थानच नव्हते.
पण,त्या दिवशी......!
शेजारच्या डोंगरातल्या दरोडेखोरांचा मोठा छापा यशवंतमाचीवर पडला...!
खंडेराय आणि वस्ताद चर्चेत व्यस्त होते तितक्यात गावात दंगा-गोंगाट ऐकू येऊ लागला.
दोघेही उठले...खुंटीला टांगलेली तलवार खंडेरायाने हातात घेतली आणि धावत तालमीतून बाहेर पळत सुटला...!
यशवंतमाची आणि पलीकडच्या डोंगरातील दाट जंगलातील "बेरड" यांची पिढ्यानपिढ्यांची दुष्मनी..!
अशी पिढी जात नव्हती कि एकमेकांचे मुडदे पडत नव्हते.मागच्या वेळेस तर याच बेरडानी शिर्क्यांचे सारे लग्नाचे वऱ्हाड कापून काढले होते.
त्याचे कारण असे,कि येसाजीराजांचे वडील आणि यशवंन्तमाची पलीकडच्या "मोऱ्यांची" हद्द एकमेकाला लागून होती.
जहागिरी,वाटणे यासाठी स्वकीयांच्यात होणार्या मारामाऱ्या कमी नव्हत्या,त्यात शिर्के –मोरे वैर महाभयानक.
आजवर ज्यांनी ज्यांनी मध्यस्ती केली त्यांचीही मुंडकी शाबूत राहिली नव्हती..!
मोऱ्यांचे पिढ्यानपिढ्यांचे कारभारी हे जाधववाडी चे "लखुजी बेरड"पाहत होते.
लखुजी बेरड मोठे बुद्धिमान आणि शूर.सारी जाधववाडी त्याना देव मानत होती,आणि लखुजी मोर्यांना देव मानत असे.
त्या दिवशी मैत्रीची खोटी आश्वासने देऊन येसाजीरावांचे वडील पिराजीराव शिर्के यांनी हद्दीसाठी मोर्यांशी दगा केला.घाटमाथ्यावरची सारी फौज कापून काढली...मात्र लखुजी बेरड आणि त्याची शे दोनशे चिवट धारकरी काही केल्या मागे हटेनात.
बरीच शिर्के मंडळी त्यांच्या हातून कत्तल होत आहे हे पाहून पिराजीरावांनी जाधववाडीवर छापा मारायला सांगून लखुजीच्या गावाची राख केली होती.....हे ऐकून लखुजीने तलवार टाकली आणि हताश होऊन कोसळला..हि संधी साधून पिराजीने त्याचे मुंडके कापले.......बस्स...तो दिवस मोरे-शिर्के वैर संपले आणि शिर्के-बेंरड वादाला तोंड फुटले...!
लखुजीच्या गावात ज्यांच्या ज्यांच्या स्त्रिया मृत्युमुखी पडल्या त्यांच्या त्यांच्या मुला-बाळांनी हातात तलवारी-कुर्हाडी घेऊन शिर्के घराणे संपवायचा विडा घेऊन गाव सोडले आणि जाधववाडी-यशवंतमाची दरम्यान च्या घनदाट जंगलात गुहेत राहून लुटालूट,जाळपोळ करून आयुष्य जगणे पसंद केले...!
त्यावेळी त्यांचा म्होरक्या होता लखुजीचा मुलगा रायराव.
रायरावाने अवघ्या २ ते ३ वर्षातच शिरक्यांच्या एका शुभ प्रसंगात चिवट बेरड फौजांनी पिराजीराव शिर्क्यांना ठार केले....आणि त्याचा बदला म्हणून काहीच दिवसात जंगलात छापा मारून रायरावाचे मुंडके शिर्क्यांनी तोडून आणले ...!
या अश्या कत्तलींचा लेखाजोखा पहिला तर साक्षात चित्रगुप्ताला शहारा येईल.....!
मुंडक्याला मुंडकी तोडली नाही तर ते शिर्के – बेरड वैरच नव्हे .....पण जेव्हापासून राजे येसाजीनी शिर्क्यांची गादी सांभाळली आहे त्यांनी बेरड आणि शिर्के यांच्या एकजूटीसाठी खूप प्रयत्न केले होते.
पण,दुहीचा शाप अजूनही संपला नव्हता......"रायराव" च्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याचा तरुण मुलगा "सूर्यराव"आता बेरडांचा म्होरक्या होता.
अतिशय शांत,शूर,मुत्सद्दी असलेला हा सूर्यराव जणू काही शपथ घेऊन होता कि शिर्के कुळ संपवले पाहिजे.
त्याने आजवर अनेक प्रयत्न केले पण ‘यशवंतमाची’ ला काही केल्या खिंडार पडत नव्हते.
राजे येसाजीनी माचीची सुरक्षा इतकी कडवी केली होती कि बेरडच काय कोणालाही अशक्य होते ते ...जर माची जिंकायचीच असा चंग बांधला कोणी तर मुंडक्यांची रास नक्कीच पडणार हे जगजाहीर होते,आणि एवढ्याश्या माचीसाठी एवढी मोठी किमत चुकवणे कोणाही मुत्सद्दी राजकर्त्याला परवडणारे नव्हते......!
पण,त्या दिवशी घात झाला होता.
राजे येसाजी सारीच फौज घाटमाथ्यावर घेऊन गेले ,अगदी थोडी फौज गावात होती ,आणि हीच खबर सूर्यराव बेरडच्या भयानक फौजेच्या कानी लागली आणि वाऱ्याच्या वेगाने ते यशवंतमाचीवर तुटून पडले.
गावातील सावकार,व्यापारी लोकांची घरे फुटू लागली.
खूप लुट जमा करून सूर्यराव बेरडाने लुट जंगलात धाडली आणि कडवे हशम बरोबर घेतले आणि त्याने त्याचा मोर्चा शिर्क्यांच्या वाड्यावर वळवला...!
डोळ्यात वडिलांच्या मृत्यूची आग घेऊन तो बेफाम घोड्यावर स्वार होऊन निघाला होता......!
खंडेराय हातात तलवार घेऊन बाहेर आला आणि त्याला जाणवले कि हातात पेटते पलिते घेऊन समोरून दौडत येणारी सारी फौज आता वाड्यावर कोसळणार...!
त्याने प्रसंगावधान राखले आणि वस्तदाना घेऊन सरळ वाडा गाठला..!
शिर्क्यांचा वाडा जणूकाही भुईकोट किल्लाच होता.
आत प्रवेश करून वाड्याचे मुख्य लाकडी द्वार बंद करायला सांगून वाड्यात मौजूद असणारी सारी फौज एकत्र केली...जेमतेम ३०/३५ लोक असतील ते ..!
प्रत्येकाला कामे वाटून देऊन वाड्याचे संरक्षण करायला सांगितले आणि तडक आपला मोर्चा वाड्यातील शिर्क्यांच्या कुटुंबाकडे वळवला.
घरातील आया-बाया आकस्मित हल्ल्याने हादरून गेल्या होत्या.
त्याना धीर देऊन तो निघणार इतक्यात शिर्क्यांची पत्नी रखमाईबाईसाहेब मोठ्या आवाजात रडत म्हणाली......थांबा...!
"माझी लेक हातात तलवार घेऊन मगाशीच चोरवाटेने बाहेर गेली आहे.काहीही करा पण माझ्या साऊला मागे आणा...बेरड –शिर्के वैर मला विचारा काय आहे ते .....एकवेळ आमच्या साऱ्यांचा जीव गेला तरी बेहत्तर पण माझ्या साऊ ला काही होता कामा नये तिने माझे काही न ऐकता १०० पैलवानांची फौज घेऊन वाड्याच्या चोरवाटेने बेरड फौजेवर चालून गेली आहे...."
हे ऐकून खंडेराय मात्र पुरता थक्क झाला......सकाळी दुध घेऊन आलेली नाजूक "सावित्री" हि शिर्क्यांची मुलगी होती तर ..!
आणि जीला नाजूक समजतोय ती रणांगण गाजवायला निघाली आहे ....!
तो खरोखर सावित्रीच्या या कामगिरीवर मनोमन खुश झाला ..!
‘’बाईसाहेब’.....राजांच्या फौजेला निरोप धडायला कोणाला तरी पाठवाल का ?
खंडेराय रखमाई बाईसाहेबाना बोलला....!
‘होय...निरोप घेऊन एक निशाणबारदार गेला आहे....फक्त काही तासात शिर्क्यांची फौज येईल...पण तोवर काही आक्रीत घडू नये ...तुम्ही जा...माझ्या साऊ ला तेवढे मागे आणा ....!
तुम्ही काळजी नका करू बाईसाहेब ....मी नक्की त्याना मागे आणतो...असे म्हणत खंडेरायाने तलवार पेलली आणि छलांग मारत तो वाड्याबाहेर दौडत गेला...!
एव्हाना माचीच्या पूर्वेकडून आर्त किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या होत्या...सावित्रीच्या नेतृत्वाखाली पैलवान फौजेने सुर्यरावाच्या फौजेवर हल्ला चढवला असावा बहुतेक.....!
सूर्याजीने पागेतील काळेभोर चांगले घोडे निवडून त्यावर मांड ठोकली..आणि वस्ताद काकाना बोलला.....काका ...प्रसंग बाका आहे,मला आई भवानी जसे सुचवते आहे तसे वागतो...ही खबर मात्र लौकर खेडेबारयाला पोहोच करा....!
मान हलवत काका बोलले...काळजी घे..आणि काका सुध्दा निघून गेले ...!
खंडेराय बेफान दौडत चालून गेला ...!
गावाच्या नदीपात्राजवळ सावित्री आणि पैलवानांच्या एकत्रित फौजेने सुर्यरावाच्या फौजेवर हल्ला चढवला...आकस्मित हल्ल्याने बेराडांची ती चिवट फौज मात्र पुरती हादरली...पण त्वरित सावरली...!
हल्ला कोणी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली केला समजले....!
शिर्क्यांची लेक सावित्री.....!
सुर्यरावाने इशारा केला.....सावित्री जिवंत पकडा.
बस्स ..हजारांच्या फौजेपुढे सावित्रीचा तो हल्ला तोकडा पडला ,सावित्रीच्या घोड्याला दोर टाकून बांधून खाली पाडले..सावित्रीच्या डोक्यावर आघात झाला आणि ती बेशुद्ध झाली......!|
मासे पकडायची जाळी टाकून तिला कैद केले...!
आल्या पावली सुर्यरावने माघारी फिरायची आज्ञा केली....!
जे साधायला आलो होतो,त्यापेक्षा कितीतरी पट गवसले अशी भावना सुर्यरावच्या मनात थैमान घालू लागली...अवघ्या काही क्षणात यशवंतमाची ओसाड झाली.......सावित्रीला जिवंत कैद करून सूर्यराव जंगलात निघून गेला...!
काही क्षणात खंडोजी तिथे पोहचला.....पण वेळ निघून गेली होती.
आता ?
आता काय...विचार करून काय होणार नव्हते...त्याने लगाम खेचला आणि बेरडांच्या फौजेमागे त्यानेही पाठलाग सुरु करायचा ठरवत घोडे जंगलात घातले.
वार्यासारख्या वेगाने खंडेराय सुर्यरावाचा पाठलाग करू लागला.
अगदी काही अंतरावर सुर्यरावाची फौज आहे याची त्याला जाणीव झाली.
त्याने घोड्याचा वेग अजून वाढवला आणि मजल दरमजल करत एका भव्य पठारी प्रदेशात त्याचे घोडे आले आणि दुसऱ्याच क्षणांत घोड्याच्या खुरात आधीपासून पेरून ठेवलेली वाघर अडकली आणि घोडा कोसळला.....सूर्यरावांच्या फौजेला क्षणात समजले होते की कोणतरी पाठलाग करतोय..!
खंडेराया जमिनीवर पडणार इतक्यात त्याने स्वताला सांभाळत सावध पवित्रा घेतला आणि उठणार इतक्यात हजारो तलवारी त्याच्या नरड्यावर आल्या......पाच पंचविस धिप्पाड हशमानी खंडेरायाला जेरबंद केले....!
क्रमश
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या
0 Comments