Advertisement

बहिर्जी नाईक- बाजींद भाग - ९

बाजींद भाग .९
"बाजींद"

भाग क्र.९

••••••••••••••••••••••••••
✍🏻लेखन/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती-मल्लविद्या\
••••••••••••••••••••••••••

कोणीतरी पाठीमागून खंडेरायाच्या डोक्यात जोराचा दणका दिला अन खंडेराय शुद्ध हरपला....!
खंडेराय ला घेऊन सूर्यराव व त्याचे पथक दाट जंगळजाळीत घुसले.
जंगलाच्या मधोमध एका गुप्तठिकाणी सूर्यरावच्या फौजेचा अड्डा होता.
गंभीर मुद्रेच्या "सूर्यरावाच्या" चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
ज्या "पिराजी" शिरक्याने साऱ्या जाधववाडीच्या हातात हत्यारे घ्यायला भाग पाडले त्याची इज्जत,त्याची नात आता त्याच्या ताब्यात होती.
त्याच्या मनात कल्पनेचे खेळ सुरु होते.
एक हशम धावत आला आणि त्याने वर्दी दिली...,

सरदार,आपण माची लुटून येताना एका घोडेस्वाराने पाठलाग चालवला होता,त्याला जेरबंद केला आहे.

सूर्यराव उठला,बोलला..."कोण आहे तो ?"

शिरक्यांच्या वाड्यातील हशम किंवा त्याच्या कुटुंब कबिल्याचा अंगरक्षक असावा बहुतेक...त्याला आणा इथे "....त्याच्या आज्ञेने खंडेराय ला समोर आणले गेले...!

एव्हाना साऊ ला शुद्ध आली होती,पण तिचे हात पाय बांधल्याने ती हलू शकत नव्हती.
ती जोरजोरात किंचाळून त्या साऱ्यांना आव्हान देऊ लागली....."हिम्मत असेल तर एकदा माझे हात पाय खोला,ही शिरक्याची अवलाद काय आहे तुम्हाला दाखवते..."

तिच्या आकस्मित आव्हानाने सूर्यराव चे डोके भडकले....तो तडक सावित्री जवळ गेला आणि तिला जोरात थप्पड मारली,एक,दोन,तीन....त्याच्या प्रहाराने सावित्रीच्या तोंडातून रक्त येऊ लागले...."

"हरामखोर शिरक्याची अवलाद....तोंड बंद ठेव...तुझ्या साऱ्या घराण्यात गद्दारी,क्रूरता भरली आहे.
गरीब,भोळ्या जनतेला लुबाडून,त्यांची कत्तल करून सत्ता मिळवलेले तुझे बापजाडे काय लायकीचे आहेत आम्हाला माहित आहे..."

असे बोलत तो निघणार तितक्यात सावित्री ने बांधलेल्या हाताने सूर्यराव वर झडप घातली....आकस्मित हल्ल्याने सूर्यराव तोल जाऊन खाली पडला.....तितक्यात बाजूला उभे असलेल्या हशमानी सावित्रीला धरून बाजूला केले...."

आता मात्र सूर्यराव बेभान झाला...त्याने कमरेला असलेली तलवार म्यानातून उपसली आणि सावित्रीचे केस धरुन तिचे हात बांधलेला दोरखंड तलवारीने तोडला,पाय खोलले आणि पुन्हा एक जोरात थप्पड देऊन तीला ढकलून दिले....सावित्री तोल जाऊन पडली.....तडक सूर्यराव ने बाजूला उभे असणाऱ्या हशमाच्या हातातील तलवार हिसकून घेऊन सावित्रीच्या पुढ्यात टाकली.....आणि बोलू लागला....

चल,उचल ती समशेर आणि दाखव तुझ्या रक्ताची उसळी...मला ही पाहुदे, ज्या शिरक्यांनी निशस्त्र आजवर बाया बापड्यावर हत्यार उचलले,त्यांच्या घरातल्या स्त्रिया हत्यारे कशी चालवतात....उठ,आता बोलू नको,तुझी तलवार बोलू दे..."

सूर्यराव चे वाक्य पुरे होते न होते इतक्यात विजेच्या वेगाने सावित्रीने तलवार हातात घेऊन क्षणाचाही विलंब न करता सूर्यराववर हल्ला चढवला...!

तितक्याच चपळाईने सूर्यरावने बचावात्मक तलवारीचे हात सुरु केले....आणि मग त्यानेही आपला हात चालवायला सुरु केली...!

एव्हाना खंडेराव ला शुद्ध आली,आणि समोर सावित्री आणि सूर्यरावची लढाई तो पाहू लागला,त्याचे रक्त एक सळसळळे...पण त्याचे हात पाय बांधून ठेवल्याने तो सावित्रीची मदत करायला असमर्थ होता,पण प्रचंड ताकतीने त्याने हात सोडवायचा प्रयत्न सुरु केला पण दोर काही सुटत नव्हता...!

समोर मात्र तलवारी तलवारीवर आपटून खणखणाट वाढू लागला आणि सूर्यराव ला सवित्रीचा तलवार चालवायचा हातखण्डा मनोमन आवडला....तो पण कच्चा नव्हता...त्यानेही प्रचंड प्रतिहल्ला करत सावित्रीला हुलकावणी दिली...क्षणभर सावित्री फसली,ती संधी घेत सूर्यराव ने तलवारीच्या मुठीचा वर्मी घाव सावित्रीच्या तोंडावर मारला....तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले...पण क्षणात सावरुन तिनेही प्रतिहल्ला केला आणि झुकत सूर्यराव च्या मांडीवर प्रहार केला...मांडीतून रक्त येऊ लागले...हे पाहताच बाजूचे पथक तलवार उपसून सवित्रीवर धावून आले...मात्र,सूर्यराव ने थांबायचा हातवारा केला.....आता मात्र सूर्यराव बेभान झाला...एक स्त्री म्हणून सावित्रीच्या तलवार हल्ल्याला त्याने नगण्य समजले होते,त्याचा तो भ्रमनिसरण झाला आणि आता मात्र त्याने प्रचंड वेगात तलवारीचे वलये,डाव-प्रतिडाव,हूल सुरु करत सावित्रीला बरेच मागे रेटले
...पण सावित्रीने सर्व हात धुडकावत लावले आणि प्रतिहल्ला सुरूच ठेवला....आणि एक क्षण..सूर्यराव ने हवेत झेप मारत गोल घिरकी घेत वार केला,ज्याने दुप्पट वेगाने हल्ला वाढला आणि तो वार सावित्रीच्या तलवारीवर लागला व तलवार हातातून खाली पडली...बस हाच क्षण सूर्यराव ने प्रचंड ताकतीने तलवार सावित्रीच्या दंडावर वर्मी मारली...रक्ताचे फवारे उडाले अन सावित्री किंचित मूर्च्छित होऊ लागली अन खाली पडली...."

बरेच वेळ प्रयत्न करून खंडेराय चे हात सुटले,त्वरित पाय सोडवून त्याने विजेच्या वेगाने सूर्यराव वर झेप घेतली....गरुड जसा सर्पावर झेप घेतो,त्यासारखीच व्याकुळता खंडेरायाच्या डोळ्यात होती.

सावित्री थोडी शुद्धीवर आली आणि समोर सुरू असलेला प्रकार पाहत तशीच पडून होती...अधीर वेदना तिला उठून देत नव्हत्या....!

खंडेराय च्या आकस्मित हल्ल्याने सूर्यराव तोल जाऊन खाली पडला,खंडेराय त्याच्या छातीवर बसून तोंडावर प्रहार मारु लागला,पण इतक्यात सावध झालेले सूर्यराव चे जवान खंडेराय वर तुटून पडले...त्याने सूर्यराव ला खंडेराय च्या तावडीतून सोडवले आणि ओढत बाजूला आणले...20-25 जणांनी करकचून धरलेल्या खंडेरायाने एकाच हिसड्यात सर्वाना भुईवर आदळले.... रागाने लालबुंद झालेला त्या वीराने समोर सावित्रीच्या हातून गळून पडलेली तलवार उचलली....क्षणभर डोळे मिटून तलवार कपाळाला लावली आणि तो समोरच्या 20-25 जणांच्या तुकडीवर तुटून पडला...!

प्रचंड रणकंदन सुरू झाले.खंडेराय च्या आडवे येणारा तुटून पडू लागला...कोणाचे हात तुटले तर कोणाचे पाय...कोणाची शिरे धडावेगळी होऊ लागली तर कोण उभा चीरु लागला...!!

काही दिवसापूर्वीच याच खंडेराय ला हातात तलवार धरायला येत नव्हती,अन आज हा इतक्या सफाईने तलवार चालवत आहे हे पाहून साऊ आश्चर्याने थक्क झाली,ती वेदना विसरून विचार करु लागली...हा खंडेराय नव्हे तर समशेरबहाद्दर वाटतो...!
ती उघड्या डोळ्यांनी खंडेराय चे शौर्य पाहू लागली...!

सैन्याची ही कापाकापी पाहून सूर्यराव लाव्हारसाप्रमाणे उसळून हाती तलवार घेऊन खंडेराय च्या आडवा आला.......आणि मग दोन महावादळे एकमेकांवर प्राणपणाने तुटून पडले...!

खंडेराय चा त्वेष,हल्ला जोमाने आडवत आडवत सूर्यराव तलवारीचे हात करु लागला....!

सूर्यराव ही कच्चा नव्हता....तोही चिवट धारकरी होता,त्यानेही प्रचंड प्रत्युत्तर दिले....ते दोन्ही वाघ रक्ताबंबाळ होऊन लढू लागले....!

अखेर खंडेराय चा आवेश पाहून सूर्यराव ने रणनीती बदलत....झुकते माप दिले अन तिथेच खंडेराय फसला....त्याचा तोल जाता क्षणीच सूर्यराव ने त्याच्या मांडीवर वर्मी घाव मारला....रक्ताचा कारंजा उसळला.....खंडेराय आलेली वेदना सहन करायला एकदम खाली बसला.....हे पाहताच सूर्यराव ने आपली समशेर खंडेराय च्या मानेवर ठेवली.....एक क्षण...त्याने प्रचंड ताकतीने तलवारीने खंडेरायाचे मुंडके तोडायला तलवार मागे नेली आणि ....सु सु सु करत एक बाण पलीकडच्या जंगलजाळीतुन सूर्यराव च्या खांद्याचा वेध घेत आला आणि समुद्रात उल्का पडावी तशी सूर्यराव च्या खांद्याचा वेध घेऊन सूर्यराव अक्षरश मागे उचलून पडला....!

दुसऱ्याच क्षणी त्या जंगलातून शेकडो बाण सूर्यराव च्या फौजेवर तुटून पडले अन फौज जखमी होऊ लागली......आणि जंगलाच्या पूर्वेकडून आरोळी घुमली..... हर हर हर महादेव......छत्रपती शिवाजी महाराज कि जय...."

भगव्या जरीपटक्यांचे निशान डोलवत शिवछत्रपतींच्या मावळ्यांची एक तुकडी हातात नंग्या तलवारी घेऊन सूर्यराव बेरड च्या फौजेवर तुटून पडली...."

सूर्यराव सावध झाला...खांद्याच्या घुसलेला बाण काढत बाजूच्या हशमाला बोलला..ही तर महाराजांची तुकडी आहे....पांढरे निशाण दाखवून थांबायला सांगा सर्वाना.....सूर्यराव मनात विचार करु लागला,आपण शिवाजी महाराजांच्या कोणत्याच गुन्ह्यात नसताना हा छापा कशासाठी असावा ?

••● क्रमश : ●••
लेखक/संकल्पना/शब्दांकन
पै.गणेश मानुगडे
कुस्ती मल्लविद्या

Post a Comment

0 Comments